Maratha Reservation: चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज- अशोक चव्हाण
Chandrakant Patil, Ashok Chavan (Photo Credit: Facebook)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्याला काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

मराठा आरक्षण प्रकरणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी पातळी सोडून केलेल्या टीका केली होती. यावर अशोक चव्हाण म्हणाले की, सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. सध्या ते सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे? हे त्यांना कळेनासे झाले आहे. यामुळे त्यांचा बोलताना तोड सुटत आहे. त्यांना मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तसेच योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, असाही टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. हे देखील वाचा- Cyclone Tauktae: महाराष्ट्रात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा हवामान विभागाकडून इशारा, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा आदेश

याआधी चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. यावेळी ते म्हणाले होते की, "रोज सकाळी उठायचे आणि केंद्र सरकारवर बोंबा मारत सुटायचे हे राहुल गांधी यांचे धोरण अशोक चव्हाण आणि मविआच्या नेत्यांनी अंगिकारले आहे. त्यामुळेच त्यांची अवस्था 'गिरे तो भी टांग उपर' अशी झाली आहे. स्वत: काहीही करायचे नाही आणि केंद्राने केल्यावर त्यांना नावे ठेवायची हे चालणार नाही, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.