मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यातील (Marathwada) पाच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. गेल्या तीन-चार दिवसांपासून परभणी, धाराशिव, लातूर, जालना आणि नांदेड जिल्ह्यांतील बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तर बीड, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही प्रमाणात बससेवा बंद आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या मालकीच्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सोमवारी संध्याकाळपर्यंत आंदोलनामुळे महाराष्ट्रातील एमएसआरटीसीच्या 250 पैकी 36 बस डेपो बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, पुणे, नाशिक, नागपुर या ठिकाणावरुन मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, हिंसाचारामध्ये 85 हून अधिक एमएसआरटीसी बसेसचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 70 बसेसचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांत आंदोलकांनी चार बसेस जाळल्या. बसेसचे नुकसान आणि इतर मालमत्तेवर झालेल्या हल्ल्यांमुळे एमएसआरटीसीला आतापर्यंत 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा: Maharashtra Drought: महाराष्ट्रातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या मोठा निर्णय)
शिवाय सेवा बंद केल्यामुळे महामंडळाला दररोज 2 ते 2.5 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनांमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर महाराष्ट्रातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 49 जणांना अटक केली आहे.