8 ऑगस्ट पर्यंत आपल्या मागण्यांबद्दल निर्णय न घेतल्यास, 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन
मराठा आरक्षण (संग्रहित प्रतिमा)

गेले अनेक महिने मराठा समाज (Maratha Community) आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. अनेक मोर्चे, आंदोलने काढल्यानंतर आता कुठे सरकारने आरक्षणाची मागणी मान्य केली आहे. मात्र अजूनही अनेक मागण्या तशाच प्रलंबित आहेत. येत्या 8 ऑगस्टपर्यंत सरकारने त्या मागण्यांबाबत काही निर्णय घेतला नाही तर, 9 ऑगस्टला म्हणजेच क्रांतीदिनी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा, मंगळवारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आला आहे. याआधी आपल्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

गेले तीन वर्षे मराठ समाज आपल्या मागण्यांसाठी सरकारशी झगडत आहे. यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते. तसेच 44 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सदस्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. मात्र त्यावर काहीच पावले उचलली नाहीत. तसेच आत्मबलिदान दिलेल्या एकाही समाजबांधवांच्या कुटुंबाला जाहीर केलेली रक्कम अद्याप मिळालेली नाही. सरकारी नोकरीचे आश्वासनही देण्यात आले होते मात्र तेही पूर्ण करण्यात आले नाही. सोबत अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्जप्रकरणे मंजूर करणे अशा अनेक मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (हेही वाचा: मराठा क्रांती ठोक मोर्चा करणार राजकारणात प्रवेश; आपल्या विविध मागण्यांसाठी लढवणार विधानसभा निवडणूक)

दरम्यान, येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2019) पार पडणार आहेत, याद्वारे क्रांती मोर्चा आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहे. टीव्ही9 ने याबाबत वृत्त दिले आहे. मराठा क्रांती मोर्चाचा मुख्यमंत्री व्हावा अशा इर्षेने हे पाऊल उचलले गेले आहे. यासाठी 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.