मराठा क्रांती ठोक मोर्चा करणार राजकारणात प्रवेश; आपल्या विविध मागण्यांसाठी लढवणार विधानसभा निवडणूक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मागच्या महिन्यात मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरवून न्यालयाने मोठा ऐतिहासिक निर्णय दिला. मात्र अजूनही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आता मराठा क्रांती ठोक मोर्चा (Maratha Kranti Morcha) राजकारणात उतरणार आहे. नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2019) पार पडणार आहेत, याद्वारे क्रांती मोर्चा आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहे. टीव्ही9 ने याबाबत वृत्त दिले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचा मुख्यमंत्री व्हावा अशा इर्षेने हे पाऊल उचलले गेले आहे. यासाठी 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले मात्र अजूनही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. याबाबत अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत, म्हणूनच आपल्या प्रश्नासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकारने फक्त आपला राजकीय फायदा पहिला आहे असा आरोप मोर्चाने केला आहे. (हेही वाचा: मराठा आरक्षण वैध पण 16% नाही, शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय)

मराठा क्रांती मोर्चाच्या महत्वाच्या मागण्या -

  • कोपर्डी घटनेतील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर ताबडतोब अंमलबजावणी करावी
  • लागू झालेल्या मराठा आरक्षणाची सर्व ठिकाणी अंमलबजावणी व्हावी
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी द्यावा
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक याबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी

दरम्यान, याधीही मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा केली होती. यासाठी त्यांनी आपले उमेदवारही जाहीर केले होते. मात्र निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र क्रांती सेनेने, निवडणूक न लढवण्याचे जाहीर करत भाजप-शिवसेनेला थेट पाठींबा दिला होता.