फेमिना मिस इंडिया 2020 स्पर्धेतील उपविजेती Manya Singh चा मंत्री अनिल परब यांच्या हस्ते सत्कार; आर्थिक मदतीसाठी युनियनद्वारे होणार प्रयत्न
मान्या सिंगचा मंत्री अनिल परब यांच्या हस्ते सत्कार (Photo Credit : Twitter)

मिस इंडिया स्पर्धा (Femina Miss India 2020) 10 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 23 वर्षीय मानसा वाराणसीने व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 चे विजेतेपद जिंकले होते. तर कुशीनगर जिल्ह्यातील हाटा निवासी ओमप्रकाश सिंग यांची कन्या मान्या सिंग (Manya Singh) हिने प्रथम उपविजेतेपद जिंकले होते. सध्या मान्या सिंहची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मान्याचे वडील रिक्षा चालक आहेत व गरीब परिस्थितीमधून मान्याने हे यश संपादन केल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. आता व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 या स्पर्धेत उपविजेती झाल्याबद्दल परिवहनमंत्री अनिल परब यांनी श्रीमती मान्या सिंह यांचा मंत्रालयीन दालनात सत्कार केला.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रिक्षाचालकाच्या मुलीने यश मिळविले हे कौतुकास्पद असून ॲड.परब यांनी श्रीमती मान्या सिंह यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुलांचा शिक्षणाचा खर्च रिक्षा युनियन उचलते. युनियनद्वारे आतापर्यंत शैक्षणिकदृष्ट्या विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या मुलांचा खर्च उचलला. व्ही एल सी सी फेमिना मिस इंडिया 2020 या स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या मान्या सिंह हिला युनियनद्वारे आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच आयुष्यात मेहनतीनेच फळ मिळते, असे सांगून परब यांनी केलेल्या सन्मानाबाबत मान्या सिंग व तिचे पिता यांनी परिवहनमंत्र्यांचे आभार मानले. (हेही वाचा: Femina Miss India 2020 ची विजेती Manasa Varanasi चे ग्लॅमरस Photos!)

10 फेब्रुवारी रोजी झालेल्या फेमिना मिस इंडिया 2020 ग्रँड फिनालेमध्ये तेलंगणाच्या मानसाने मिस इंडियाचा मुकुट जिंकला, तर मान्या सिंग आणि मनिका श्योकंद प्रथम आणि द्वितीय उपविजेत्या ठरल्या. बैतालपूर ब्लॉकमधील विक्रम विशुनपूर गावात एका साध्या कुटुंबात जन्मलेली मान्या देसाई देवरिया भागातील लोहिया इंटर कॉलेजमध्ये हायस्कूलची विद्यार्थिनी होती. तिचे वडील ओमप्रकाश सिंह कुशीनगरच्या हाटाच्या स्थानिक भागात ऑटो चवीत होते. नंतर ते मुंबईला आले. डिसेंबर 2020 मध्ये मान्या सिंग 'मिस उत्तर प्रदेश' झाली होती.