
महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांमध्ये मराठा समाजाविषयी द्वेष आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभा घ्याव्या लागत आहेत असं मत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी व्यक्त केली. “नारायणगड या ठिकाणी आम्ही सभा घेणार आहोत. ३ मे रोजी सभेच्या ठिकाणी जाऊन तयारीची अंतिम पाहणी करणार आहोत. ९०० एकर जागेवर ही सभा होते आहे.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. “मराठा बांधवांमध्ये समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही कारण मी राजकारण करत नाही. मी महायुतीलाही पाठिंबा दिलेला नाही आणि महाविकास आघाडीलाही पाठिंबा दिला नाही. कुठला अपक्ष उमेदवारही दिलेला नाही. त्यामुळे समज गैरसमज बाळगू नका” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. (हेही वाचा - PM Modi In Satara: 'मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही'; पंतप्रधान मोदींची विरोधकांच्या आरोपांवर टीका (Watch Video))
जे सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूने आहेत त्यांना मतदान करा असंच मी सांगेन. निवडणुकीत समोरच्याला पाडणं हा देखील विजयच असतो. त्यासाठी निवडणुकीला उभंच रहावं असं नाही. आम्ही जे काही बोलतो त्यातून ज्यांना जो काही मेसेज जायचा आहे तो गेला आहे असंही सूचक वक्तव्य जरांगे यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार आजवर केलेला नाही. मात्र महाराष्ट्रातले जे भाजपाचे नेत्यांनी त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की महाराष्ट्रात त्यांना पाच टप्प्यांत निवडणूक घ्यावी लागते आहे. ज्या ठिकाणी 88 उमेदवार आहेत त्या उत्तर प्रदेशात एका टप्प्यात निवडणूक पार पडते आहे. तर 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक घ्यावी लागते आहे. ही वेळ मोदींवर महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्यांनी आणली असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.