Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात! मनोज जरांगे पाटील यांची भविष्यवाणी
Manoj Jarange Patil and Devendra Fadnavis Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधत राज्य सरकारलाही इशारा दिला आहे. समाज एकवटला आहे. राज्य सरकारने आरक्षणाबाबत काही गडबड केली तर ती त्यांना महागात पडेल. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय अस्तित्वही धोक्यात आले असल्याची भविष्यवाणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आपणावर आपण याचा माणूस त्याचा माणूस असे आरोप सातत्याने केले जात आहेत. पण, मी एकच सांगतो की, मी कोणाचाही नाही. मी फक्त समाजाचा आहे. उद्या शरद पवार यांनी जरी मराठा समाजाविरोधात भूमिका घेतली तर मी त्यांचाही तीव्र विरोध करेन, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

'मी मराठा समाजाचा माणूस'

जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, मी मराठा समाजाचा माणूस आहे. मी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांचा माणूस असल्याचा आरोपही माझ्यावर सातत्याने करत होत असतो. पण, मी माझ्या समाजाशिवाय कोणाचाच नाही. संपूर्ण मराठा आरक्षण मिळविण्यासाठी समाज एकवटला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमुळे मराठा समाज अधिक एकवटला आहे. आता फडणवीस यांच्यासाठी हे जड जाईल. त्यामुळे त्यांनी आमच्याबाबत विचार करतानाच विचार करावा, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास Bombay High Court चा नकार)

देवेद्र फडणवीस यांना थेट इशारा

मराठा समाजाची लोकसंख्या जाणीवपूर्वक कमी दाखवली जात आहे. देवेद्र फडणवीस आपण सत्तेचा वापर करुन जर काही गडबड पुन्हा कराल तर समाजाला पुन्हा एकत्र यावे लागेल, असे आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारला दिले आहे. लातू जिल्ह्यातील अहमदपूर येथील संवाद बैठकीदरम्यान जरांगे पाटील बोलत होते. या वेळी पाटील यांनी टीकेचा रोख फडणवीस यांच्यावर कायम ठेवला. (हेही वाचा, Manoj Jarange Patil Sangharsh Yodh Movie Teaser: मनोज जरांगे पाटील संघर्षयोद्धा सिनेमाचा टीझर जारी (Watch Video))

राज्य सरकारने आमची एसआयटी चौकशी सुरु केली आहे. आम्ही चौकशीला सामोरे जाऊ आणि संपूर्ण सहकार्यही करु. पण काय चुकलं आमचं? देवेंद्र फडणवीस तुमच्या आयुष्यात तुम्ही केलेली ही सर्वात मोठी चूक आहे. तुमचं राजकीय अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. मी कधी तुमच्याविरोधात भूमिका घेतली नव्हती. पण, तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आमच्यासाठी सापळा रचला म्हणून आम्ही तुमच्या विरोधात आहोत, असे सांगायलाही जरांगे पाटील विसरले नाहीत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.