मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगेंची (Manoj Jarange) पदयात्रा 25 जानेवारी रोजी नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणार आहे. यासाठी 25 जानेवारीला रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसंच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. (हेही वाचा - Maratha Reservation: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा 25 जानेवारीला बंद)
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. या मोर्चात शेकडोच्या संख्येने मराठा बांधवही सहभागी झाले. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाले.
गुरुवार 25 जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.