Mandwa Ro Ro Service (Photo Credits: Twitter)

भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचा (Mandwa Ro Ro Service) लोकार्पण सोहळा आज होणार होता. मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा औपचारिक उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. मात्र ही सेवा आजपासून सुरु झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ट्विटच्या माध्यमातून या रो रो सेवेला शुभेच्छा दिल्या आहेत. मांडवा रो रो सेवा हा जलवाहतुकीत मैलाचा दगड ठरेल अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे. या सेवेमुळे किफायतशीर व पर्यावरणस्नेही जलवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.

गेल्या कित्येक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेली भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा आजपासून सुरु झाली आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांचे ट्विट:

किनारपट्टीमध्ये जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर 19 किमी असून या जलवाहतुकीने 1 तासात कापता येते.रो पॅक्सची क्षमता एकावेळी 500 प्रवासी आणि 145 वाहने नेण्याची आहे.

'कोरोना' प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांनुसार फेरीसेवेचा आज होत असलेला औपचारिक उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करत या फेरीसेवेच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा आरमाराचे प्रमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा वारसा, एका आधुनिक पद्धतीनं आपण पुढे नेत आहोत, यासेवेमुळे, भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ पाऊण तासात पूर्ण होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि इंधनात बचत होईल. मुंबई-गोवा मार्गावरची वाहतुक कोंडी कमी होण्यासही मदत होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.