BMC मध्ये नोकरीचं आमिष दाखवत एका व्यक्तीने 6 जणांना फसवत उकळले 13.34 लाख
BMC | (File Photo)

बीएमसी (BMC) मध्ये नोकरीचं आमिष दाखवून 6 जणांना फसवल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी एका व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या व्यक्तीने लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून 13.34 लाख उकळले आहेत. फसवणूक करणार्‍या व्यक्तीचं नाव सुनील प्रभाकर खोत्रे असे आहे. तो चेंबूर- टिळकनगर भागातील रहिवासी आहे. त्याने काहींना बीएमसी मध्ये लिपिकची नोकरी मिळवून देणार असल्याचं सांगत फसवणूक केली आहे.

मागील वर्षभरापासून त्याने बीएमसीत नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना लुबाडलं असल्याचं ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशनचे इन्सपेक्टर एस जी हट्टेकर यांनी TOI शी बोलताना म्हटलं आहे. हे देखील वाचा: Fake Job Scam: बनावट जॉब ऑफर्स पासून सावध राहण्याचा Naukri.com चा इशारा; Fake Job Offer कशी ओळखाल? 

नोकरीचं आमिष दाखवताना त्याने खोटी अपॉईंटमेंट लेटर्स, आयडी कार्ड्स, पोलिस आणि मेडिकल व्हेरिफिकेशन लेटर्स दिली आहेत. काही महिन्यांनी आपली फसवणूक झाल्याचं संबंधितांना समजलं आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. बुधवारी ठाणे पोलिसांनी फसवणूक झालेल्यांची तक्रार नोंदवून घेत एफआयआर रजिस्टर करून घेतली आहे.

कोरोना संकट काळामध्ये अनेकांची ऑनलाईन देखील फसवणूक झालेली आहे. त्यामुळे नोकरीचं आमिष दाखवत खाजगी माहिती चोरणं, आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करताना संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा सूत्रांकडून माहिती तपासून पहा.