Narayan Rane: नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, दिशा सालियन प्रकरणी गंभीर आरोप भोवण्याची शक्यता
Narayan Rane, Disha Salian | (Photo Credit: Archived, edited, representative images)

दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे या पितापुत्रांनी अनेक गंभीर आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे निराधार आरोप करुन दिशा सालियन आणि कुटुंबीयांची बदनामी केले प्रकरणी महिला आयोगाने राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिला आयोगाने दिलेल्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. एके दिवशी तिने आत्महत्या केली. या आत्महत्येवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तिच्यावर जेव्हा बलात्कार होत होता तेव्हा एका मंत्र्याचे सुरक्षारक्षक फ्लॅटबाहेर होते, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी अनेकदा केला आहे. तसेच, दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवालही आला नसल्याचे राणे यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Narayan Rane On State Government: दिशा सालियनच्या हत्येचं रहस्य उघड करणार असल्याने सुशांत सिंगची हत्या, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गौप्यस्फोट, मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा म्हणाले...)

नारायण राणे यांनी वारंवार केलेल्या आरोपांनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे तक्रारही केली होती. त्यानंतर महिला आयोगाने मालवणी पोलिसांकडून मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी महिला आयोगाला अहवाल दिला. पोलिसांचा अहवाल प्राप्त होताच महिला आयोगाने राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दिशा सालियनबाबत बोलले जाणारे सर्व काही चुकीचे आहे. तिच्यावर बलात्कार झाला नाही. राजकारण्यांनी त्यांच्या राजकारणासाठी आमच्या मुलीची आणि कुटुंबीयांची बदनामी करु नये. आम्ही अत्यंत व्याकूळ झालो आहोत. आम्ही आमची मुलगी गमावली आहे. आमच्या भावना लक्षात घ्या. कृपा करुन बदनामी थांबवा.