मालाड मालवणी झोपडपट्टी आग | (Photo courtesy: Twitter)

मालाड येथील मालवणी परिसरातील झोपडपट्टीला रविवारी (९ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अगिचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच, आगीमध्ये नेमके किती नुकसान झाले. किती झोपड्यांना आगीचा फटका बसला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

रविवारची सुट्टी असल्याने झोपडपट्टीतील अनेक नागरिक घरीच होते. त्यामुळे आगीची माहिती कळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली. भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरीकही मदत करत आहेत.(हेही वाचा,  पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग)

आगीचे लोटच्या लोट आकाशाकडे झेपावत आहेत. परिसरात धुराचे लोटही पाहाला मिळत आहेत. आगीत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे.