पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसह एकूण 46 खासदार आज मंत्रीपदाची शपथ घेत असल्याची माहिती आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांना मोदी सरकार 3.0 मध्ये स्थान मिळणार नाही. बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुडेंचे (Pankaja Munde) कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि भावूक झाले आहेत. त्यातूनच, पंकजा मुंडेंना केंद्रात कॅबिनेटमंत्रीपद देण्याची मागणी करण्यात येत आहे. बीड (Beed) लोकसभेत यंदा बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. या लढतीत पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. तरीही, त्यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी होत आहे. (हेही वाचा - अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात स्थान नाही; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न)
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येला बीड शहरभर पंकजा मुंडे यांना वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेटमंत्रीपद द्यावं, अशा मागणीचे बॅनर झळकले आहेत. विशेष म्हणजे बीड शहरभर हे बॅनर लागल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या गणेश लांडे यांनी हे बॅनर लावलेले असून ताईंना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, यासाठी बॅनरबाजी करण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. याचा तीव्र निषेध केला जात आहे. याचा निषेध म्हणून सकल ओबीसी समाज तथा मुंडे समर्थकांकडून हा बंद पुकारण्यात आला असून याबाबतचे निवेदन काल परळी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. आजच्या पुकारण्यात आलेल्या बंदला परळी शहरातील व्यापाऱ्यांसह दुकानदारांकडून मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळाले आहे.