Anna Hazare on Lokayukta Law: लोकायुक्त कायदा करा, नाहीतर राजीनामा द्या; अण्णा हजारे यांचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा
Anna Hazare | (Photo Credits: You Tube)

Anna Hazare on Lokayukta Law: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी लोकायुक्त कायद्यावरून ठाकरे सरकारला (Thackeray Government) आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार असताना कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, फडणवीस सरकार (Fadnavis Government) गेल्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासनही दिले होते.

दोन वर्षे झाली तरी मुख्यमंत्री यावर काहीही बोलायला तयार नाहीत. अडीच वर्षे झाली तरी काहीच होत नसल्याची व्यथा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री आमच्या मागणीकडे का दुर्लक्ष करत आहेत, मला माहीत नाही. अखेर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. एकतर कायदा करा अन्यथा राजीनामा द्या, असा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. (हेही वाचा - Navneet Rana On Uddhav Thackeray: नवनीत राणांचा उद्धव ठाकरेवर हल्लाबोल, सत्तेचा करत आहे गैरवापर)

आज अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारलाही फटकारले. सरकारने लेखी आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. लोकायुक्त कायद्यांतर्गत सात बैठका झाल्या. दोन वर्षे झाली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत बोलायला तयार नाहीत. राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये आमच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यात पुन्हा एकदा जनआंदोलनाची गरज आहे, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकपाल विधेयक 17 डिसेंबर 2013 रोजी राज्यसभेत मंजूर झाले आणि 18 डिसेंबर 2013 रोजी लोकसभेत मंजूर झाले. राष्ट्रपतींनी 1 जानेवारी 2014 रोजी लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याला संमती दिली होती.