Mumbai: जेवणाची डिलिव्हरी करणाऱ्या युवकाने एका महिलेला मारहाण करत घरातील पैसे चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या माहीम (Mahim) परिसरात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. रात्री साधारण साडेतीन वाजता ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्विगीच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर, डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने या महिलेस मारहाण केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या महिलेले घडलेला प्रकार सर्वांसमोर मांडला आहे. याबाबत माहीम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला असून, पोलीस या प्रकरणाची पुढील तपासणी करत आहेत. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पिडीता व तिच्या मैत्रिणीने जेवणाची ऑर्डर दिली. सोबत डिलिव्हरी बॉयला येताना काही सिगारेट्स घेऊन येण्याची विनंती केली आणि तो तयारही झाला. जेव्हा तो जेवण घेऊन आला तेव्हा त्याने या दोघींसाठी अपमानास्पद शब्दांचा वापर केला. त्यानंतर जबरदस्तीने त्याने घरात प्रवेश केला व बाहेर जाण्यास नकार दिला. पहाटे साडेतीन वाजले होते, अशात या दोघीही घाबरलेल्या होत्या. जेव्हा या महिलेच्या मैत्रिणीने त्याला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा त्याने या दोघींना मारण्याचा प्रयत्न केला. तसेच घरात समोर ठेवलेले पैसे चोरून तो निघून गेला. दहा मिनिटानंतर त्याच्या चार मित्रांसह तो परत आला व धमकी देऊ लागला. (हेही वाचा: विरार: दारु पिण्यासाठी आलेल्या तरुणाला बिअर शॉपवर झालेल्या वादातून जबरदस्त मारहाण, आरोपी फरार)
या प्रकरणी जेव्हा पीडितेने पोलिसांकडे संपर्क साधला, तेव्हा तिला मदत मिळण्याऐवजी एका पोलिस स्टेशनमधून दुसर्या पोलिस स्टेशनकडे धाव घ्यावी लागली. या महिलेने दावा केला आहे की, पोलिसांनी तिला ती मदयपान आणि धुम्रपान करते का? पालकांना याची जाणीव आहे का? असे लाजीरवाणे प्रश्न विचारले. पोलिसांनी ही गोष्ट अमान्य केली असून, सध्या माहीम पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.