कितीही जवळच्या व्यक्तीने आपली साथ सोडली तरी आपली सावली आपल्या सोबत कायम राहते. याचा प्रत्यय आपण सर्वांना घेतला आहे. पण आता सावली देखील आपली साथ सोडणार आहे. मे महिन्यामध्ये शून्य सावली दिवसाचा (Zero Shadow Day) अनुभव घेता येणार आहे. ऐकायला आश्चर्यकारक वाटत असलं तरी राज्यात 3 मे पासून 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस राज्यातील सर्व शहरांमध्ये अनुभवता येणार आहेत. या खगोलीय घटनेचा तुम्ही देखील अनुभव घेऊ शकता. मात्र वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवस आणि वेळा वेगळ्या असणार आहेत.
मुंबई, नवी मुंबई, बोरीवली, ठाणे, कल्याण, बदलापूर, वसई, विरार या ठिकाणी 15 मे पासून 28 जुलैपर्यंत शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. तर कोल्हापूर मध्ये 3 मे आणि धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस असेल. विदर्भात 15 मे नंतर शून्य सावली दिवसाचा प्रत्यय येईल. दरम्यान, https://alokm.com/zsd.html या लिंकवर क्लिक करुन तुम्ही शून्य सावली दिवसाची माहिती मिळवू शकता. यावर तुम्हाला तुमच्या शहरात किंवा गावात शून्य सावली दिवस कधी आहे, त्याची वेळ कोणती, याची माहिती मिळेल.
काय आहे शून्य सावली दिवस?
सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची क्षितीजावरील जागा बदलते. 23 डिसेंबर ते 21 जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. सूर्य दररोज 50 अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते. त्यास शून्य सावली दिवस असे म्हणतात.