महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यात थंडीची लाट ओसरत चालली असून मुंबईत गेल्या 2-3 दिवसांपासून तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात छान थंडी पडली होती. मात्र आता हळूहळू ही लाट ओसरत चालली असून उन्हाळा जवळ येत असल्याचे संकेत देत आहे असेच म्हणावे लागेल. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरनाई येथे 22.1 अंश सेल्सियस इतके तापमान आहे. त्यापाठोपाठ सांताक्रूज येथे 20.8 अंश सेल्सियस इतके तापमान आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र आता हळूहळू तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.हेदेखील वाचा- महाराष्ट्र: राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे विजय वडेट्टीवारांचे जिल्हाधिका-यांना निर्देश
महाराष्ट्रातील महत्त्वांच्या जिल्ह्यांमध्ये आजचे तापमान:
औरंगाबाद- 17.2
जालना- 19.6
नांदेड- 15.5
परभणी- 19.6
सांताक्रूज- 20.8
उस्मानाबाद- 18.1
सोलापूर- 20
कोल्हापूर- 21
सातारा- 17.6
सांगली- 20
ठाणे- 20.8
पुणे- 14.6
डहाणू- 20.5
रत्नागिरी- 20.2
नाशिक- 14.2
बारामती- 16
हरनाई- 22.1 माथेरान- 20.4
फेब्रुवारी महिन्यात काही दिवसांपूर्वी परभणी, सांगली, उस्मानाबाद, सातारा, अकोला, भंडारा आदि जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पोखर्णी, दैठणा परसरात वादळ वारा आणि विजा चमकल्या. सांगली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. द्राक्ष पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला.
अवकाळी पावसामुळे सांगली परिसरात द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. दुसऱ्या बाजूला ज्वारी, हरबरा आदी पिकांनाही याचा मोठा फटका बसला. यामुळे हे नुकसान कसे भरून काढायचे या विचारात बळीराजा आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.