राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेने (Heatwave ) नागरिक हैराण आहेत. दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने (Untimely Rain in Maharashtra) शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. अवकाळी पावसामुळे उष्णतेचा पारा काहीसा खाली येण्यास मदत होत असली तरी शेतीचे मोठेच नुकसान होऊ लागले आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात याचा फटका अधिक बसू लागला आहे. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष शेतीवर अवकाळी पावसाचा वाईट परिणाम होतोआहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दरम्यान, नेहमीच्या तुलनेत यंदा अधिकच उष्णता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्रात सध्या सुगीचा काळ आहे. अनेक ठिकाणी शेतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस पडलेल्या ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या भागात अवकाळीचा अधिक मोठ्या प्रमाणावर फटका बसला. त्यामुळे आंबा, फणस, काजू, कोकम, करवंद, जांभूळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दरम्यान, देशभरातील उष्णतेबाबत माहिती देताना हवामान विभागाने म्हटले आहे. संपूर्ण भारताच्या तुलनेत प्रामुख्याने पाच राज्यांत यंदा उष्णता (Heat Wave) अधिक जाणवेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. प्रामुख्याने राजस्थान, दिल्ली, हरियाणा, यूपी आणि ओडिशा राज्यात उन्हाचा तडाखा यंदा नेहमीपेक्षा अधिक जाणवेल. तर भारताच्या इतरही अनेक ठिकाणी पारा 45 डिग्री सेल्सियसच्याही वर जाईलअसा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. राजधानी दिल्लीत काल आणि आजही नेहमीच्या तुलनेत दोन ते तीन डिग्री सेल्सियस अंशाची वृद्धी पाहायला मिळाली. इतर राज्यांमध्येही उष्णतेची वाढ कायम आहे.