Maharashtra Vidhan Sabha Elections 2019: शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता
Aditya Thackeray Jan Ashirwad Yatra Photo | (Photo Credits: Twitter/Aditya Thackeray)

Maharashtra Legislative Assembly Election 2019: शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) हे आता विधानसभा निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष उतरणार हे आता जवळपास नक्की झाले आहे असे दिसते. गेल्या काही काळापासून शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील जनतेच्या संपर्कात राहणारे आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढविणारा पहिलाच चेहरा ठरु शकतात. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात आदित्य हे वरळी (Worli Constituency) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. त्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेशही शिवसैनिकांना दिल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेच्या गोटातून मात्र अद्याप या गोष्टीला दुजोरा मिळू शकला नाही.

शिवसेना आमदार आणि कट्टर शिवसैनिक अनिल परब यांच्या उपस्थितीत वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा एक मेळावा शुक्रवारी पार पडला. या मेळाव्यात आमदार परब यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. याच वेळी आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार असल्याचे सागितल्याचे समजते. महत्त्वाचे म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुनील शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना प्रवेशकर्ते झालेले आमदार सचिन अहिर हेसुद्धा या मेळाव्यास उपस्थित होते. तसेच, शिंदे व अहिर यांनी परब यांच्या घोषणेचे मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचे मटाच्या वत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, Shiv Sena Jan Ashirwad Yatra: युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जन आशीर्वाद यात्रेतील हटके फोटो)

दरम्यान, वरळी मतदारसंघात शिवसेनेची ताकद आता वाढली आहे. विधानसभा मतदारसंघ 2014 मध्ये झालेल्या शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन अहिर यांच्यात प्रमुख लढत झाली. यात अहिर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मात्र विधानसभा निवडणुक 2019 पूर्वी राजकीय परिस्थिती बदलली. आता सचिन अहिर यांनीच शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघातील लढत ही एकतर्फी म्हणजेच शिवसेनेच्या बाजूने होईल, असा विश्वास शिवसैनिकांमध्ये आहे.