कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात घेण्यात आलेल्या लॉकडाऊन हटवत म्हणजेच अनलॉक करत राज्य सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली. उद्योग, व्यवसाय, सेवा, कार्यालयं यांना विविध मुभा दिल्या. परंतू, मुंबई लोकल (Mumbai Local) प्रवास करण्यास मात्र अद्याप तरी सर्वासामान्यांना मुभा नाही. त्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार याबाबतही काही निश्चित असे सांगता येत नाही. दरम्यान, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईकरांना मात्र एक दिलासा देणारे वृत्त आहे. खासगी क्षेत्रात कार्यरत (Private Sector Employees) असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई लोकल सेवा वापरुन प्रवास करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार त्याबाबत योजना आखत असून ती अंतीम टप्प्यात असल्याचे समजते. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
राज्य सरकारने दिलेल्या मान्यतेनुसार खासगी क्षेत्रात काम करणारे मुंबईकर सध्या पूल कार, एसटी किंवा बेस्ट बस अथवा स्वत:च्या कारने प्रवास करत आहेत. मात्र, सर्वच मुंबईकरांना हे शक्य नाही. मुंबई लोकल ही मुंबई शहराची केवळ ओळखच नव्हे तर धावती वाहिणी आहे. मुंबई शहरात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक मुंबईकर हा लोकल प्रवासालाच प्राधान्य देतो. मुंबईची नैसर्गिक रचना आणि विकसित झालेली दळणवळण व्यवस्था विचारात घेता लोकल सेवेला पर्याय नाही. मात्र, कोरोना व्हायरस संकटामुळे गेल्या प्रदीर्घ काळापासून लोकल सेवा बंद आहे. अशा वेळी सामान्य मुंबईकर लोकल प्रवासाची चातकासारखी वाट पाहात आहेत. (हेही वाचा, Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून विरार- चर्चगेट- विरार मार्गावर 2 महिला विशेष रेल्वे फेर्या सुरू; इथे पहा वेळापत्रक)
दरम्यान, राज्य सरकारने अनलॉक करत असताना 30% उपस्थितीत खासगी कार्यालये सुरु करण्यास परवानगी दिलीआहे. परंतू, मुंबई शहरामध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला कार्यालयात वेळेत (!) उपस्थित राहायचे तर लोकल सेवेला पर्याय नाही. त्यामुळे राज्य सरकारने लोकस सेवा त्वरीत सुरु करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, लोकल सेवा सुरु कराव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'सविनय कायदेभंग' आंदोलनही केले होते.
राज्य सरकारकडून खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना लोकल सेवेचा वापर करता यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला लोकल प्रवासास मान्यता देत असताना खासगी क्षेत्रांनीही आपल्या कार्यालयीन कामाच्या वेळांत काहीसा बदल करत सहकार्य करावे, अशी भावना राज्याच्या मदत आणि पूनर्वसन विभागाने व्यक्त केली आहे.