Nightlife In Mumbai: मुंबईत नाईटलाईफ तर सुरु होणारच, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया
Aditya Thackeray | (Photo Credits-Facebook)

कोरोना व्हायरस संकटानंतर मुंबई नाईटलाईफ (Mumbai Nightlife ) या विषयाचे काय होणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. मात्र, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देत मुंबईत पुन्हा एकदा नाईट लाईफ (Nightlife In Mumbai) सुरु करणारच, असे म्हटले आहे. कोरोना व्हायरस काळात मुंबईतील नाईट लाईफ बंद ठेवण्यात आले होते. आता मिशन बिगिनिंग अगेन मध्ये मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे संकेत पर्यटनमंत्री ठाकरे ( Aditya Thackeray on Mumbai Nightlife) यांनी दिले आहेत.

आदित्या ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात सर्व काही ठप्प झाले. त्यानंतर मिशन बिगीन अगेन सुरु केल्यावर आता सर्व काही सुरळीत सुरु करण्यास आणि पूर्वपदावर आणण्यास आम्ही सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे एकदा सुरु केलेली कोणतीही गोष्ट पुन्हा बंद करण्याची वेळ आली नाही, असेही ठाकरे यांनी या वेळी म्हटले. लवकरच आता याच धर्तीवर मुंबईत नाईटलाईफ सुद्धा सुरु करत आहोत असेही ठाकरे यांनी म्हटले. या वेळे त्यांनी मुंबईत रेस्टॉरंट रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याकडे लक्ष्य वेधले. (हेही वाचा, Maharashtra Politics In Future: 'हे' तरुण नेते भविष्यात करु शकतील महाराष्ट्राचे नेतृत्व)

राज्यातील पर्यटन व्यवसाय वृद्धी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच आम्ही एमटीडीसी आणि इतर हॉटेल व्यावसायिक यांच्यासोबत भागिदारी करत आहोत. यातून उत्पन्नाची नवी साधनं निर्माण होतील, असेही ते म्हणाले. यासोबतच राज्यातील पर्यटन व्यवसायासाठी आणखी काही महत्त्वाचील पावले टाकली जात असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. केंद्रीय अर्थसंकल्पात काही गोष्टी चांगल्या आहेत. त्यांनी पर्यावरण, पर्यटन यांबाबत ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्या गोष्टी ठिक आहेत. परंतू, हा अर्थसंकल्प निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केला आहे की काय असे वाटते. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यांकडे अधिक लक्ष देण्यात आल्याचे पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका नाहीत त्यांकडे मात्र म्हणावे तितके लक्ष देण्यात आले नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.