सध्या महाराष्ट्रात कोविड-19 (Coronavirus) पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईमध्ये आज 961 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशात राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय अशी भीती निर्माण होत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी रविवारी एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरू केल्या जातील आणि सरकार लवकरच तपशीलवार एसओपी जारी करेल. महाराष्ट्रातील काही भागातील शाळा आधीच सुरू झाल्या आहेत, तर काही 9 जून, 13 जून आणि 15 जून रोजी सुरू होतील.
'कोविड-19 चे रुग्ण वाढत असले तरी योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जातील. शाळांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करायचा की नाही याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. शाळांच्या कामकाजादरम्यान काय करावे आणि करू नये यावर सरकार एक मानक कार्यप्रणाली (SOP) घेऊन येईल,’ असे गायकवाड म्हणाल्या.
सध्या महाराष्ट्रात दररोज साधारण दीड हजार नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली जात आहेत आणि सक्रिय रुग्णांची संख्या 6767 वर पोहोचली आहे. यामुळे एकीकडे सरकारने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे गायकवाड यांचे हे शाळेबाबतचे हे विधान समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीदेखील राज्य सरकारला चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरणाची अंमलबजावणी वाढवण्यास सांगितले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी नागरी आणि जिल्हा प्रशासनाला कोविड-19 लसीकरणाची गती वाढवण्यास सांगितले आहे, यामुळे हॉस्पिटलायझेशन आणि संभाव्य मृत्यू लक्षणीयरीत्या कमी होतील अशी अशा आहे. (हेही वाचा: इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा)
यासह आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी ट्रेन, बस, सिनेमा, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये आणि शाळा यासारख्या बंद सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढत्या कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणांवर चिंता व्यक्त केली, परंतु त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही असेही स्पष्ट केले. ही कोविड-19 महामारीची चौथी लाट असू शकते, मात्र, घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले.