वीज (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाही, तसेच रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट हा जर 24 तासात 204 मिमी पाऊस पडला तर देण्यात येतो. कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला नाही. ऑरेंज अलर्ट हा जर 24 तासात 115 ते 204 मिमी पाऊस पडला, तर देण्यात येतो. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

येलो अलर्ट हा 24 तासांत 65 ते 115 मिमी पाऊस पडला तर देण्यात येतो. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सातारा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना सध्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ग्रीन अलर्ट हा 65 मिमी पाऊस पडणार असेल तर देण्यात येतो. वरील सर्व जिल्हे वगळून हा अलर्ट देण्यात आला आहे.

प्रशासनाने आपत्तींच्या चेतावणी व मदतीसाठी उपयुक्त ॲप्स आणि फोन नंबर जारी केले आहेत. वज्राघात प्रवण जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये ‘दामिनी: लाइटनिंग अलर्ट ॲप’ डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटरच्या परिसरातील विजेसाठी जीपीएस नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील सामायिक करते.

नागरिकांनी आपत्तींच्या चेतावणी आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता ‘SACHET ॲप’ डाउनलोड व इन्स्टॉल करावे. राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे. (हेही वाचा: रस्ते सुरक्षितता वाढवण्यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली; खाजगी बसेसची होणार कडक तपासणी, दैनंदिन लॉगबुक ठेवणे बंधनकारक)

आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in