मान्सून (Monsoon 2022) आला आला म्हणता म्हणता आता बराच काळ झाला. राज्यात पावसाचा मात्र पत्ता नाही. परिणामी शेतकरी आणि राज्याताली प्रत्येक नागरिक पाऊस कधी बरसणार म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलासादायक (IMD) माहिती दिली आहे. पुढच्या काहीच दिवसात राज्यात दमदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
यंदा सरासरीपेक्षा पाऊस काहीसा अधिकच पडेल असा मान्सूनपूर्व अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. उलट पावसाने हुलकावणीच दिली. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. अल्पशा पावसावर सहाजिकच काही शेतकऱ्यांनी बी मातीत घातले आहे खरे. पण, आता पाऊस लांबणीवर पडल्याने त्यांनीही आकाशाकडे डोळे लावले आहेत. अशा स्थितीत पावसाची हजेरी अत्यंत महत्त्वाची आहे. तरच शेतीलादिलासामिळूशकणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, 'या' भागांत पाऊस पडण्याची शक्यता)
हवामान विभागाने म्हटले आहे की, येत्या चार दिवसांमध्ये दक्षिण कोकण परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढणे अपेक्षीत आहे. पावसाची संभाव्य शक्यता गृहीत धरुन हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस दमदार असेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. प्रामुख्याने पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.