Sanjay Raut | (PC - ANI)

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ज्याचा महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवर मोठा परिणाम होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून करण्यात आलेली भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार बेकायदेशीर असून ते संविधानाच्या विरोधात आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर विविध राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे सरकार बेकायदेशीर-प्रियंका चतुर्वेदी 

भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून करण्यात आलेली निवड बेकायदेशीर आहे, असे कोर्टानेच म्हटले आहे. राज्यपालांच्या निर्णयावरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या सर्वाचा अर्थ एकच की हे सरकार बेकायदेशीर आहे. न्यायालयाने या सरकारच्या तोंडावर चपराक लगावली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, SC Judgment On Maharashtra Political Crisis: नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापिठाकडे वर्ग, उद्धव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य)

आपला निर्णय राज्यघटनेला धरुन- नरहरी झिरवळ

नॉट रिचेबलच्या वृत्तानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण नॉट रिचेबल नसल्याचे म्हटले आहे. शिवाय आपण जो निर्मय दिला तो कायद्याचा अभ्यास करुनच आणि राज्यघटनेला अनुसरुनच घेतला असल्याचे नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे. मी तेव्हा घेतलेला निर्णय चुकीचा असेल असे म्हटलं तर आपण कायद्यावर संशय घेतो असाच त्याचा अर्थ होतो, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केली आहे.