सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली आहे. दरम्यान आजचा युक्तिवाद संपला आहे आणि उद्या (4 ऑगस्ट) पुन्हा सुनावणीला सुरूवात होणार आहे. शिवसेनेने (Shiv Sena) 16 आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटीसीवर आता न्यायालय काय निर्णय घेणार? याचा निवाडा होणार आहे. त्यादृष्टीने उद्याची सुनावणी महत्त्वाची असल्याचं मत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना नव्याने लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितलं आहे. कायदा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याने न्याय मिळेल असे शिवसेना नेत्यांकडून बोलून दाखवला जात आहे. शिवसेनेची बाजू कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांनी मांडली आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस सोबतच अन्य संबंधित याचिकांवर यामध्ये एकत्रच सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तांतर वैध की अवैध याचा न्यायनिवाडा त्यावरूनच होणार आहे.
CJI : Okay Mr.Salve, I will take as first case tomorrow morning#ShivSena #MaharashtraPolitcalCrisis #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) August 3, 2022
शिंदेगटाकडून विधानसभा अध्यक्षांची आता निवड झाली आहे त्यामुळे त्यांना अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय घेता यावा अशी मागणी करता त्यांनी आता हा निकालही सर्वोच्च न्यायालयाकडून घेतला जाणार असल्याचं चित्र आज सुनावणीमध्ये बघायला मिळालं आहे. मूळ शिवसेना कोणती या प्रश्नाकडे देखील आता सार्यांचं लक्ष आहे. तुम्ही निवडणूक आय़ोगाकडे जाण्याचा उद्देश काय आहे? अशी विचारणा कोर्टाने शिंदेगटाकडे केली तेव्हा त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडी सुरू आहेत. मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे. चिन्ह कोणाला मिळावे? हा मुद्दा असल्याचं ते म्हणाले. कोर्टात जर तुम्ही शिवसेना पक्षामध्येच आहात मग वेगळं चिन्हं कशाला? हा प्रश्न देखील न्यायालयाने विचारला आहे.
शिंदेगटाकडून आपण शिवसेनेमध्येच आहोत असा दावा केला आहे पण न्यायालयात तो टेक्निकल नव्हे तर शेड्युल 10 प्रमाणे तुमची बाजू मांडून सांगा असं सरन्यायाधीश म्हणाले आहेत. यावर बोलताना मात्र आपण वेगळा गट असून त्यानुसार पक्षातून दूर गेलेले नसल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार आमदारांवर कारवाई होऊ नये असा शिंदेगटाचं मत आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठाकडे आहे आणि आता या प्रकरणाच्या सुनावणी मध्ये आता पुढे काय होणार यासाठी उद्याची सुनावणी महत्त्वाची आहे.