Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणेसाठी (Police Recruitment 2024) 19 जूनपासून भरती मोहीम सुरु होत आहे. साधारण 17,471 शिपाई पदे भरण्यासाठी तब्बल 17.76 लाख अर्ज आले आहेत. या भरतीसाठी मैदानी चाचणी परीक्षा येत्या 19 जून पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. अशात पोलीस भरती प्रक्रियेत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मैदानी चाचणी आल्यास, उमेदवाराला दोन्ही ठिकाणी गुण मिळण्याची सुविधा पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये एका ठिकाणी परीक्षा दिल्यानंतर त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी 4 दिवसांचा अवधी मिळेल.

अनेक उमेदवार एकावेळी दोन पदांसाठी अर्ज करतात. अशावेळी या दोन पदांच्या मैदानी परिक्षेच्या तारखा एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. आता या बाबीची महाराष्ट्र पोलीस दलाकडून दखल घेण्यात आली आहे. पोलीस भरतीमध्ये ज्यांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल, अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जाणार आहेत.

पहा पोस्ट- 

याबाबत महाराष्ट्र पोलीस म्हणतात, ‘महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणेसाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक 19 जून 2024 पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहणे बाबतची स्थिती निर्माण होवू शकते व त्यामुळे काही उमेदवरांची गैरसोय होवू शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना व विभागास सूचना देण्यात आली आहे की, ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहणेसाठी सूचना दिली असेल, असा उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी. दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी.’ (हेही वाचा: Viral Video: वेळ हुकली, UPSC च्या उमेदवाराला नाकारले, परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालक ढसाढसा रडले)

पुढे म्हटले आहे, ‘मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी raunak saraf@mahait.org यावर ईमेल करावा.’