Devendra Fadnavis (PC - ANI)

पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2022) कधी होणार? याकडे डोळे लावून बसलेल्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पाठीमागील दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती (Police Recruitment) लवकरच राबवली जाणार आहे. राज्य पोलीस दलातील 20 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती सोमवारी (26 सप्टेंबर) दिली. पाठिमागील दोन वर्षे राज्यात कोरोना महामारीचा उद्रेक पाहायला मिळाला होता. या काळात लॉकडाऊन आणि इतर सर्वच यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. परिणामी पोलीस भरतीही रखडली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुण आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय पोलीस भरती संदर्भातील आहे. दोन वर्षे पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे दोन वर्षांची पोलीस भरती आम्ही घेणार आहोत. त्यामधये 20 हजार पदे भरली जातील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (हेही वाचा, IRCTC Recruitment 2022: भारतीय रेल्वे मध्ये HRD Joint General Manager पदासाठी नोकरभरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज?)

दरम्यान, पोलीस भरती संदर्भात एक जाहीरात निघाली आहे. ही जाहीरात साडेसात ते आठ हजार पदांसाठी आहे. आता नव्या भरतीबाबतही आम्ही लवकरच जाहीरात काढणार आहोत. त्यामुळे राज्यातील तरुणांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असे आम्हाला वाटते. राज्यातील अधिकाधिक तरुण या भरतीसाठी प्रयत्न करतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. हे तरुण चांगले शिक्षित आहेत. अशा वेळी त्यांच्या हाताला काम नसल्याने ते बेकार असल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी जर पोलीस भरती निघाली तर अनेकांच्या हाताला काम आणि कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही भरती दिलासादायक असेल असे बोलले जात आहे. दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकार असतानाच पोलीस भरतीसंदर्भात हालचाली झाल्या होत्या. मात्र, नेमक्या वेळी राज्यावर कोरोना महामारीचे मोठे संकट आले. परिणामी सर्व यंत्रणाच ठप्प झाली किंवा त्याला मर्यादा आल्या. त्यामुळे पोलीस भरती रखडली. कोरोना महामारी आली नसती तर राज्यात या आधीच पोलीस भरती झाली असते, असेही सांगितले जाते.