महाराष्ट्र (Maharashtra) हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. राज्यात 36 जिल्हे असून, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत ‘महाराष्ट्र पोलीस’ (Maharashtra Police). आज, 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा 59 वा वर्धापन दिन (Maharashtra Police Raising Day)आहे.
या दिनाचे औचित्य साधून, मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपली उपस्तिथी दर्शवली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाशी संवादही साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांचे विशेष संचलन देखील यावेळी पार पडले, यामध्ये जवळजवळ 250 पोलिसांचा सहभाग होता.
Maharashtra Police Raising Day Celebration. https://t.co/6UyAVuTMRC
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) January 2, 2020
महाराष्ट्र पोलीस दल इतिहास -
महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास पाहिला तर पहिली नोंद आढळते ती 1661 साली. त्या वेळी पोर्तुगीजांनी पोलिस चौकीची स्थापना करून भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. त्यानंतर 1672 साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली. हीच फौज अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला.
1936 मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे 1947 मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलिस असे ठेवले गेले. राज्य पुनर्गठन अधिनियम,1956 नंतर, मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन, गुजरात पोलिस, म्हैसूर पोलिस (नंतर नाव बदलून कर्नाटक पोलिस) आणि महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी झाली. अखेर 2 जानेवारी 1961 साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरीत्या स्थापना झाली.
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. सध्याचे महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून दोन वर्षांपासून हा ‘स्थापना दिन’ साजरा होत आहे. यामुळेच आज राज्यात विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, ५९व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाशी संवाद साधताना.https://t.co/DN9T0bNSZf
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) January 2, 2020
आजच्या या वर्धापन दिनानिमित्त हर्ष फायरचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे. तसेच यावेळी पोलिसांच्या 200 जणांचा सहभाग असलेल्या बँड पथकाचे सादरीकरण होणार आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे होते, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक आहे. या दलात 10 पोलीस आयुक्तालये व 36 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे 1,80,000 असून, मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.