Maharashtra Online Education: कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद, लवकरच सुरु होणार ऑनलाइन शिक्षण; मंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश
Varsha Gaikwad | (Photo Credits-Facebook)

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात प्रशासनाने अनेक नवे निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यातील शाळाही बंद झाली आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने, शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, राज्यामध्ये इ.पहिली ते बारावीच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देश गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. (हेही वाचा: HC Recruitment 2022: बाॅम्बे हायकोर्टात नोकरीच संधी, 27 जानेवारी पर्यंत करता येईल अर्ज)

दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 33,470 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. आज राज्यात 29,671 रुग्ण बरे झाले असून, 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 2,06,046 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 66,02,103 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 2,505 लोकं संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणांची संख्या 1,247 वर गेली आहे.