परतीचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रभर ठाण मांडून बसला आहे. या पावसाने संपुर्ण महाराष्ट्राला झोडपले असून काही जिल्ह्यात या पावसामुळे पिकांचे देखील नुकसान झाले आहे. तसेच दिवाळी अगदी तोंडावर आलेली असताना या पावसामुळे लोकांच्या उत्साहावर देखील विरजण पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठेत देखील लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाल्यामुळे परतीच्या पावसालाही उशीर झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आह. तसेच 28 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस सुरु राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत (Mumbai) ब-याच भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असला तरीही हा पाऊस ढगांच्या कडकडाटासह बरसत आहे. येत्या दोन-तीन दिवसात अशाच स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 28 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहिल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली.
तसेच 25 ऑक्टोबर ला कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भातही मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंगळवारी (22 ऑक्टोबर) दिवसभरात राज्यात पावसाने दडी मारली. मात्र, रात्री 9 नंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली. फोर्ट, कुलाबा, वरळी, दादर आणि पश्चिम उपनगरात काही ठिकाणी 5 मिमीपर्यंत पाऊस झाला.