Maharashtra Monsoon Session 2021: शेतकरी दुश्मन आहेत का? कृषी कायद्यावरून छगन भुजबळ आक्रमक, मोदी सरकारवर डागली टीकेची तोफ
chhagan bhujbal, Narendra Modi (Photo Credit: Twitter and PTI)

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session 2021) आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना (Farms Laws) आव्हान देणारी तीन कृषी विधेयक राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करत छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीकेची तोफ डागली आहे. दरम्यान ते म्हणाले की, दोन-चार दिवसांचे आंदोलन किती त्रासदायक असते. परंतु, दिल्लीच्या सीमेवर गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. ते दुश्मन आहेत का? पाकिस्तानातून आले आहेत का? असाही सवाल त्यांनी त्यावेळी उपस्थित केला आहे.

दिल्लीत लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. अख्ख्या जगाने याची नोंद घेतली. आंदोलनाच्या ठिकाणी करोनामुळे आणि इतर आजारांमुळे दगावले. एकाचा मृत्यू झाला, तरी आपण संवेदना व्यक्त करतो. पण, 200 पेक्षा जास्त बळी गेला. पण, दुर्दैव असे की, मंत्री यायचे, चर्चा करायचे आणि जायचे. शेतकऱ्यांनी भेटायला जायला म्हणून सांगितले, तर शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले गेले. याची नोंद जगाने घेतली. टीका झाल्यावर खिळे काढले, असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत. हे देखील वाचा- 'काही महत्त्वाचे घडल्यास सांगेन, अजूनतरी केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत कॉल आला नाही'- BJP MP Narayan Rane

संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असताना शेतकरी कुटुंबासहित शेतात राबत होता. त्याने कोरोना पाहिला नाही, रोगराई बघितली नाही आणि अन्नधान्य पिकवले. इतरांप्रमाणे शेतकरीही कोरोना योद्धाच आहे. पंतप्रधान मोफत धान्याचे वाटप करतात, पण पिकवतो कोण? शेतकऱ्यांचा गुन्हा काय आहे? त्यांचे एवढेच म्हणणे आहे की, हे कायदे अन्यायकारक आहेत. मग तरीही मग तरीही कायद्यांचा अट्टाहास का? असाही सवाल भुजबळ यांनी विचारला आहे.

दिल्लीत आठ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का? कायदे करताना विरोध होतो, त्यावेळी लोकांना काय हव आहे ते लक्षात घेतो. तसेच कायदे मागे घेतो. बोलायचे काय? बोलायला लागले की ईडीची विडी शिलगावतात, असाही टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.