Maharashtra MLC Election Results 2020: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एका जागेवर भाजप उमेदवाराचा विजय, अन्य 4 जागांचे निकाल बाकी
Vidhan Bhawan | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रामध्ये 1 डिसेंबरला झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकांचे निकाल हळूहळू समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत 1 जागेचा निकाल समोर आला असून अन्य 4 जागांचे निकाल येणे बाकी आहे. यात धुळे-नंदुरबार (Dhule-Nandurbar) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय झाला आहे. ही जागा भाजपने (BJP) काबीज केली असली तरी अन्य 4 जागांवर मात्र महाविकासआघाडीने (MahavikasAghadi) मोठी आघाडी घेतली आहे. या जागांच्या निकालासाठी अजून काही तास लागणार आहेत.

भाजपाने पुणे मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन रामदास धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, नागपूर मध्ये कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी, पुण्यात कॉंग्रेसचे जयंत आसनगावकर, मनसेच्या रूपाली पाटील या निवडणूकीच्या रिंगणात आहेत.हेदेखील वाचा- Maharashtra MLC Election 2020: पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकासआघाडी, भाजपमध्ये बंडखोरीचे फटाके; पाहा कुठेकुठे बंडाचा झेंडा

दरम्यान धुळे-नंदुरबार जागेवर भाजपने विजय मिळवला असला तरी अन्य जागांवर महाविकासआघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेत या निवडणुकीचे चित्र पालटले आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकासआघाडी ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर असून, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे पिछाडीवर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे आहेत. तिसऱ्या स्थानावर लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात असून, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार चौथ्या स्थानावर आहेत.

महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. यामध्ये 31 सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. तर 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते. उर्वरित 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात.