मुंबई: महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनाबधित पोलिसाच्या संपर्कात आल्याने घेतला Home Quarantine मध्ये राहण्याचा निर्णय
Jitendra Awhad | (Photo Credits: Twitter)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सध्या स्वत:ला होम क्वारंटीन करून घेतले आहे.  Times Now च्या रिपोर्ट्स  नुसार मुंब्रा परिसरात एका पोलिसाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्या पोलिसाच्या संपर्कात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या डॉ. जितेंद्र आव्हाड होम क्वारंटीन आहेत. लवकरच त्यांची चाचणी करून त्यांना देखील कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे का? याची तपासणी केली जाणार आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच काही पत्रकारदेखील संपर्कात आले होते. त्यांना देखील विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा मतदारसंघात लोकप्रतिनिधी आहेत. मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशावेळेस अनेकदा जितेंद्र आव्हाड रस्त्यावर उतरून नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं, घरीच सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्याची देखील पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाणे: Coronavirus Lockdown चे नियम कडक करत मुंब्रा, कळवा परिसरात दूध, भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश.  

मागील काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड हे नाव बरेच चर्चेमध्ये आहे. आक्षेपार्ह पोस्ट लिहणार्‍या एका इंजिनियरला जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्यासमोर बेदम मारल्याचे आरोप आहेत. तसेच फेसबूकवरही जितेंद्र आव्हाड यांना धमकी आल्याचं समोर आलं होतं.

महाराष्ट्रामध्ये सध्या देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. राज्यातील कोव्हिड पॉझिटिव्ह आकडा 1982 पर्यंत पोहचला आहे. तर हीच वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता महाराष्ट्रामध्ये 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.