चितळे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे (Kakasaheb Chitale) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 78 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काकासाहेब चितळे यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुख व्यक्त केले आहे. तसेच काकासाहेब चितळे यांच्या निधनाने दूरदृष्टी असलेला मेहनती अभ्यासू उद्योजक महाराष्ट्राने गमावला आहे, असे लिहून उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहली आहे. चितळे उद्योग समूह जगभर प्रसिद्ध आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री करणे हा चितळे उद्योगसमूहाचा प्रमुख व्यवसाय आहे. काकासाहेब यांना चितळे उद्योग समूहाचे आधारस्थंभ म्हणून ओळखले जात होते.

काकासाहेब चितळेंना यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शुक्रवारी मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. काकासाहेब यांच्या निधननंतर राज्यातील दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहली. यात उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. काकासाहेब चितळे यांच्या निधनाने दूरदृष्टी असलेला मेहनती व अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला आहे. या क्षेत्रात उद्योग उभारू इच्छिणाऱ्या अनेक नव्या उद्योजकांसाठी काकासाहेब चितळे यांच्या उद्योगांची भरभराट नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे असे सांगून उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. काकासाहेब चितळे यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर, दुग्ध उत्पादन कसे वाढेल तसेच चांगल्या गाई व म्हशींच्या प्रजाती कशा निर्माण होतील यासाठी संशोधनावर भर दिला, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, तोपर्यंत दिल्लीवारी नाही- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री कार्यलयाचे ट्वीट-

दरम्यान, चितळे डेअरी आणि उद्योगसमूह ही एक दुग्धोत्पादक संस्था आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया, दूध पाश्‍चरायजेशन, विविध दुग्ध उत्पादने तयार करण्याचे काम ही कंपनी करते. महाराष्ट्र आणि भारतासह जगभरात नामांकीत म्हणून चितळे समूहाकडे पाहिले जाते. चितळे दूध, दही, तूप, भाकरवडी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ ही या उद्योगसमूहाची ओळख आहे. प्रतिदिन 2.4 लाख लिटर दुग्धोत्पादन करण्याची ही कंपनी क्षमता ठेवते. ही संस्था पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांतून दूध पुरवठा व विक्री करते. काकासाहेब चितळे यांच्या निधनाने या कंपनीस मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.