पोलिस | File Photo

बेळगाव (Belgaum) मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून (Maharashtra Ekikaran Samiti) आज व्हॅक्सीन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मराठी बांधवांच्या मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांमध्ये तह करण्यात आला. मात्र या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ फासण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्यात आले आणि हा स्टेज हटवण्यात आला आहे. तसेच सीमा भागावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते कोल्हापूरातून बेळगावच्या दिशेने निघाले आहेत. त्यामध्ये हसन मुश्रीफ देखील उपस्थित आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक जण हायवे वरून चालत चालले आहे. बेळगावात काही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही परवानगी नाकारण्यात आली आहे. असे स्पष्ट केले आहे. काल रात्री स्टेज उभारण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. ही तोंडी परवानगी होती. नंतर लेखी परवानगी दिली जाईल असं सांगण्यात आले होते. मात्र आज अचानक पोलिसांनी स्टेज बांधण्याचे काम थांबवले आहे. हा प्रकार आमची गळचेपी असल्याची असल्याची प्रतिक्रिया महराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी दिली आहे. नक्की वाचा: Belagavi दौरा अद्याप रद्द झालेला नाही; पहा Shambhuraj Desai यांनी बेळगाव दौर्‍यावर काय दिले अपडेट्स .

दरम्यान सध्या दोन्ही राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे. यावेळी सीमाभागातील मराठी बांधवांशी बोलून त्यांच्या मनातील भावना जाणून घेणार असल्याची माहिती दिली आहे.