Maharashtra Karnataka Border Dispute: सीमाप्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळात आज कर्नाटक सरकारविरोधात ठराव
Vidhan Bhavan, Nagpur | (File Image)

कर्नाटक (Karnataka) सरकारने केलेल्या ठरावामुळे महाराष्ट्रात संतप्त भावना आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) प्रकरण आणखीच तापले आहे. परिणामी विरोधकांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर (Nagpur Winter Session) येथे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विरोधकांनी प्रश्न लावून धरल्यावर आता सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळात ठराव आणण्याचे अश्वासन दिले आहे. त्यानुसार राज्य विधिमंडळात आज कर्नाटक सरकार विरोधात ठराव आणला जाणार आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विधानसभेत काल (26 डिसेंबर) अनेक प्रश्न विचारले होते. कर्नाटक सरकार सातत्याने सीमाभागातील नागरिकांवर अत्याचर करत आहे. घटना आणि नियमांचा मर्यादाभंग करत आहे. त्यावर महाराष्ट्र सरकार काय करत आहे? कर्नाटक सरकारने विधिंडळात ठरवा आणला आहे. महाराष्ट्र सरकारने अद्यापही असा कोणताच ठरवा आणला नाही, असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांवर विरोधी बाकावरुन जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी उद्या (आज, 27 डिसेंबर) विधिमंडळात तसा ठराव आणण्याचे आश्वासन दिले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Winter Session 2022: उद्धव ठाकरे, अजित पवार विधिमंडळात आक्रमक; सीमावाद, गायरान जमीन, एनआयटी घोटाळा प्रकरण चर्चेत)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन राज्यभरात तीव्र असंतोष आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वारंवार वादग्रस्त विधाने करत आहेत. महाराष्ट्रावर टीका करत आहेत. त्यांच्या सरकारने विधिमंडळात तसा ठरावही मंजूर केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या आगळीकीवर अद्याप एकही वाक्य बोलले नाही. त्यांची कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार या सर्व प्रश्नांवर नेमकी काय भूमिका व्यक्त करतात याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, सीमावादाच्या प्रश्नावरुन शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे देखील विधानपरिषदेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्र्यांकडून वारंवावर महाराष्ट्राबद्दल केल्या जाणाऱ्या अवमानकारक वक्तव्यांबद्दल राज्य सरकार काय पावले उचलत आहे याबाबत जाब विचारला. तसेच, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र असा उल्लेख करत सीमेवरील गावांवर होत असलेल्या कर्नाटकी जुलूम, अन्यायाविरोधात सरकारची भूमिका काय असा सवालही त्यांनी विचारला. याच वेळी त्यांनी सभागृहाला एक पेनड्राईव्ह आणि काही पुस्तकं देत सीमाभागातील मराठी बांधवांची महाराष्ट्राशी नाते कसे आणि किती घट्ट आहे याबाबत माहिती दिली. सदर पेन ड्राईव्ह आणि पुस्तकं विधिमंडळ सदस्यांना द्यावीत असेही म्हटले.