Maharashtra: लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील 'या' 15 जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे संकट कायम; येथे पाहा यादी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. यातच महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील रेडझोन वगळता इतर जिल्ह्यात 1 जूननंतर काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे तुमच्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर विविध जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आली आहे. तर काही जिल्ह्यात अजूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. महत्वाचे म्हणजे, या 15 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे. यात बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. हे देखील वाचा- Coronavirus: दिलासादायक! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज पाचशेहून कमी रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात आज 22 हजार 122 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 42 हजार 320 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 51 लाख 82 हजार 592 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3 लाख 27 हजार 580 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.51% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.