राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विनंतीनंतर निवडणुक आयोगाची उद्या बैठक; महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीवर होणार चर्चा
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (B S Koshyari) यांनी विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार या रिक्त असलेल्या 9 जागांवरील निवडणुकांबाबत भारतीय निवडणूक आयोगाची बैठक उद्या पार पडणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्या आहेत आणि निवडणूक कार्यक्रमही स्थगित केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा प्रश्न निर्माण झाला असून घटनात्मक पेचही उद्भवला आहे. हा पेच सोडविण्यासाठी महाविकासआघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री प्रयत्न करत आहेत. अशात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. राज्यपाल काय भूमिका घेतात यावर महविकासआघाडी सरकारचे भवितव्य अवलबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. कोणत्याही मंत्र्याने मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यांत विधिमंडळाच्या दोनपैकी कोणत्याही एका सभागृाहचे सभासद होणे बधनकारक आहे. राज्यत तर कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन सुरु आहे. निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका पुढे ढकलल्या आहेत आणि निवडणूक कार्यक्रमही स्थगित केला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळेच हा सर्व पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्याचा एक विद्यमान मार्ग आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्यत्व देणे. महाविकासआघाडी मंत्रिमंडलाने तसा प्रस्तावही राज्यपालांना दिला आहे. मात्र, राज्यपालांनी त्यावर अद्यापही कोणताही निर्णय न घेतल्याने हा पेच अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

पीटीआय ट्विट

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. संविधानाच्या तत्वांचे पालन करीतच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो. शिवाय, यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल. मा. मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.