महाराष्ट्रात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असल्याने काही वाद निर्माण होत आहेत. अशामध्येच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या वधासाठी (Afzal Khan) वापरण्यात आलेली वाघनखं परत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत लवकरच एक बैठक होणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं आणि शिवरायांची भवानी तलवार ब्रिटन मध्ये आहे. ती परत आणण्यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनापर्यंत दोन्ही गोष्टी भारतामध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान हा आंतरराष्ट्रीय विषय असून पुढे काय होईल हे ठाऊक नसल्याचं ते म्हणाले आहेत.
वाघनखं ब्रिटनला दिलं तेव्हाची सर्टिफिकेट मिळाली आहे. सध्या वाघनखं तेथे असल्याने सर्टिफिकेट मागवलं आहे. आणि त्याच्याच आधारे पहिली बैठक अमित शाह यांच्यासोबत होईल. याबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रव्यवहार सुरू आहे. गरज पडल्यास ब्रिटन सरकारसोबतही चर्चा करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
2024 साली 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन 350 वा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. 6 जून 2024 हा संकल्प आणि शपथ दिवस असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.