राज्यात 26 जानेवारी पासून तुरुंग पर्यटनाला (Jail Tourism) सुरुवात होत आहे. पुण्यातील (Pune) येरवडा जेल (Yerawada Central Jail) पासून तुरुंग पर्यटन खुलं होणार असून याद्वारे नागरिकांना तुरुंगाची सफर करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. पुण्यातील येरवडा सेंट्रल जेलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) या योजनेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारातील हा देशातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
तुरुंग पर्यटनाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येरवडा जेल पासून होत आहे. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि इतर लोक यांना या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देता येणार आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभ भाई पटेल, सरोजनी नायडू, सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेक दिग्गजांच्या स्मृती या वास्तूत आहेत.
या ऐतिहासिक वास्तूचा जवळून अनुभव घेण्यासाठी 5 ते 50 रुपयांपर्यंत तिकीट दर असणार आहेत. त्याचबरोबर गाईडची सोय देखील येथे मिळणार आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरस संकटकाळात सध्या दिवसाला केवळ 50 जणांनाच तुरुंग पर्यटन करता येणार आहे. तसंच या तुरुंग पर्यटनात ठाणे, नाशिक, रत्नागिरी येथील तुरुंगांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात एकूण 60 तुरुंग आहेत. त्यात 24 हजार कैदी आहेत तर 3 हजार कैदी तात्पुरत्या तुरुंगात आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
यापूर्वी केवळ सिनेमा, मालिकांमध्ये तुरुंग पाहणाऱ्या सामान्य नागरिकांला प्रत्यक्ष तुरुंगाला थेट भेट देता येणार आहे आणि त्याबद्दलची माहिती ही मिळवता येणार आहे. त्यामुळे सरकारच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.