महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्ण संख्या आता कमी होत असल्याने स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. नोकरदार व्यक्ती कामावर परतत आहेत, शाळा पुन्हा खुल्या झाल्या आहेत. पण लहान मुलांसाठी शाळेचे दरवाजे कशी खुलणार याची सार्यांना प्रतिक्षा होती पण आता ती देखील संपणार आहे. ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथी चे वर्ग देखील सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य चाईल्ड टास्क फोर्स (Child Task Force) कडून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याला परवानगी दिली आहे. लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेणार असल्याचेही संकेत टोपेंनी दिले आहेत.
दरम्यान पहिली ते चौथीचे वर्ग हे अटीशर्थींनी सुरू करण्याच्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सूचना आहेत. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांद्वारा कोरोना वायरस परसरण्याची शक्यता आहे. मात्र 12-18 वर्षातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. नक्की वाचा: Maharashtra Schools Reopen: महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार .
शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत देखील शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. शालेय शिक्षण विभाग देखील शाळा सुरू करण्याबाबत विचार करत आहे. आरोग्य विभागाची परवानगी असल्याने उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल, पुढे मुख्यमंत्री स्तरावर या संदर्भात अंतिम निर्णय होईल अशी माहिती टोपेंनी दिली आहे.
टास्क फोर्स कडून राज्य सरकारला सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि बोर्डिंग शाळा सुरू करता येतील असं टास्क फोर्सने राज्य सरकारला सांगितले आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. दरम्यान बोर्डिंग स्कुल मध्ये येताना आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट बंधनकारक करावा असा सल्ला देण्यात आला आहे.