Asha Bhosale यांना 24 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार; भव्य सोहळा सामान्यांसाठीही खुला
आशा भोसले । इंस्टाग्राम

बॉलिवूडच्या मेलेडी क्वीन आशा भोसले (Asha Bhosale) यांना शुक्रवार 24 मार्च दिवशी महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) देऊन गौरवलं जाणार आहे. या पुरस्काराची घोषणा 2021 मध्ये झाल्यानंतर आता उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते तो त्यांना प्रदान केला जाणार आहे. दरम्यान हा पुरस्कार सोहळा गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India) वर आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी सर्वसामान्यांना देखील असणार आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील काही नाट्यगृहांवर मोफत प्रवेश पत्रिका ठेवण्यात आल्या आहेत. प्रथम येणार्‍यास प्राधान्य तत्त्वावर त्यांचे वाटप होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र सरकार कडून देण्यात येणारा मानाचा पुरस्कार आहे. या सोहळ्याला राज्य सरकारकडून उद्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Maharashtra Bhushan: महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविल्याबद्ल आशा भोसले यांच्याकडून राज्यातील जनतेचे आभार .

आशा भोसले यांच्या सन्मानापूर्वी 'आवाज चांदण्याचे' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायक सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषीकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार हे आशाताईंच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुमित राघवन करणार आहे.

शिवाजी नाटयमंदिर - दादर, दामोदर हॉल - परळ, प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह - बोरीवली, दीनानाथ नाटयगृह - विलेपार्ले, काशिनाथ घाणेकर नाटयगृह - ठाणे, वासुदेव बळवंत फडके नाटयगृह- पनवेल, आचार्य अत्रे नाटयगृह - कल्याण, गडकरी रंगायतन - ठाणे, विष्णूदास भावे नाटयगृह -वाशी येथे प्रवेश पत्रिका उपलब्ध असणार आहेत.

आशा भोसले या मंगेशकर कुटुंबातील पंचरत्नांपैकी एक आहेत. मराठी सोबतच हिंदी, बंगाली, गुजराती सारख्या  प्रादेशिक भाषांसोबत त्यांनी इंग्रजीतही गाणी गायली आहेत. अनेक इंटरनॅशंल प्रोजेक्टचा भाग राहिल्या आहेत. 89 वर्षीय आशा भोसले आजही तरूण पिढीच्या संगीतासोबत स्वतःला जुळवून घेत त्यांना मार्गदर्शन करत असतात.