महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) एकाच वेळी 44 आयएएस अधिकार्यांच्या (IAS Officer) बदल्यांची ऑर्डर काल जारी करण्यात आली आहे. यामध्ये मनिषा म्हैसकर, अभिजीत बांगर, तुकाराम मुंढे, राजेश नार्वेकर यांचा समावेश आहे. मनिषा म्हैसकर यांना मंत्रालयात प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर अभिजीत बांगर हे ठाणे महानगरपालिका आयुक्त असणार आहेत. संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त करण्यात आले आहे.
पालकमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची मुख्य सचिवांकडे तक्रार केल्यानंतर त्यांची देखील या बदल्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. आता ते बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास विभागात आले आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय हेल्थ मिशनच्या आयुक्त तथा संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांची ठाण्यात आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्ती झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी ए. आर. काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या महासंचालक पदावर पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असंघटित कामगार विकास आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे आता वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. आदिवासी विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची नियुक्ती अल्पसंख्याक विभागाचे सचिव म्हणून नेमण्यात आले आहे.
उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.