राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का; सरकारने काढून घेतेली सुरक्षा
Jitendra Awhad and Chhagan Bhujbal | (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची सुरक्षा राज्य सरकारने काढून घेतली आहे. या दोन्ही नेत्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या धमक्यांनंतर राज्य सरकारकडून या दोन्ही नेत्यांना सुरक्षा देण्यात आली. दरम्यान, दिलेली सुरक्षा अचानक काढून घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, ही सुरक्षा काढून घेण्यामागे सरकारचा नेमका विचार काय आहे, हे समजू शकले नाही. विरोधकांनी मात्र निवडणुकीच्या तोंडावर सरकार गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, सुरक्षा काढून घेऊन जर आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न सरकार करु पाहात असेल तर, मी घाबरणाऱ्यांपैकी नाही. सोशल मीडिया आणि खुले व्यासपीठ आदी माध्यमांतून आपण व्यक्त होत राहू. सुरक्षा काढण्यामागे सरकारचा हेतू काय आहे हे समजू शकले नाही. पण, सरकारचे हे धोरण योग्य नसल्याची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (हेही वाचा, खळबळजनक: डोंबिवलीत भाजप शहर उपाध्यक्षाच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त)

दुरऱ्या बाजूला, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा देताना त्या सुरक्षेची श्रेणी ठरविण्यात येते. एकदा दिलेली सुरक्षा काढून घेतानाही सुरक्षा पुरवणाऱ्या समितीत निर्णय होतो. मात्र, त्या व्यक्तिला असलेला धोका टळला आहे का, याचीही पाहणी केली जाते. पण, सरकारने याचा कुटलाही विचार न करता हा निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते आहेत. नेहमी लोकांमध्ये असलेल्या नेत्याबाबत असा निर्णय योग्य नाही. सरकारच्या या भूमिकेविरुद्ध आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.