Maharashtra Police Bharti 2020: महाराष्ट्रात होणार तब्बल 12,500 पोलिसांची भरती; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
Maharashtra Police | (File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात सुरु झालेल्या लॉक डाऊनमुळे (Lockdown) राज्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे व्यवसाय बंद पडले. या काळात सरकारने खर्च कमी करण्यासाठी अनेक गोष्टींवर रोख लावली होती. महाराष्ट्रातही विकासकामे, भरती प्रक्रिया रखडली होती. अशात आता राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आता तब्बल 12,500 पोलिसांची भरती (Maharashtra Police Bharti 2020) होणार आहे. आज गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे’

याआधी राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच, पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याची घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती. याशिवाय नागपूरमधील कटोललतुका येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन देखील स्थापित केली जाईल, असेही सांगण्यात आले होते. आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे, देशमुख यांनी सांगितले. (हेही वाचा: राज्यात 10 हजार पोलिसांची भरती, वर्षभरात होणार प्रक्रिया पूर्ण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा)

सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या या काळात राज्यातील पोलीस फ्रंटलाईन वर लढत आहेत. गेले काही महिने या पोलिसांवर प्रचंड ताण आहे. यातील अनेकांना कोरोनाची लागणही झाली आहे, त्यामुळे ही नवीन होणारी पोलीस भरती महत्वाची ठरत आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरू होती. मात्र आता पोलीस भरतीबाबत सरकारने आज अधिकृत घोषणा केल्याने बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिस दलामध्ये आज (16 सप्टेंबर) 247 जणांना कोरोनाची लागण झाली असून दोन पोलिस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पोलिस खात्यात 20,003 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 204 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3728 कोरोनाबाधित पोलिस कर्मचार्‍यांव उ पचार सुरू आहेत.