Sanjay Raut (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा कौल हाती आल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी संघर्ष शिगेला पोहचला आहे. यामध्ये महायुतीला मतदारांचा कौल देण्यात आला असला तरीही अद्याप सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये वाटाघाटी सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, सध्या भाजपाने 13:26 असा फॉर्म्युला दिला आहे. शिवसेना उद्या (31 ऑक्टोबर) विधीमंडळाचा नेता निवडणार आहे. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ठरल्याप्रमाणे सारे झाल्यास महायुतीचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा येईल. त्यामुळे सत्तेमध्ये 50% वाट्यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेची भूमिका नरमली का? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

'मुख्यमंत्रिपद' आणि '50-50% फॉर्म्युला' यावर आम्ही बोलत आहोत. व्यक्ती नव्हे तर महाराष्ट्र ही आत्ता प्राधान्याची गोष्ट आहे. सत्ता स्थापनेसाठी 145 हा बहुमताचा आकडा आहे तो कोणीही नेता वा आमदार या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असेही संजय राऊत यावेळेस म्हणाले. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल विशिष्ट पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील पण बहुमत सिद्ध करावं लागतं त्याचं काय? असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राची कुंडली शिवसेनाचं बनवणार आहे या कुंडलीत कोणते ग्रह कुठे बसवायचे, कोणाचे तारे चमकवायचे हे आम्ही ठरवू असे म्हणतं शिवसेनाच किंगमेकरच्या भूमिकेत असेल असेही सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

ANI Tweet 

भाजपाने आज देवेंद्र फडणवीस यांची आज गटनेतेपदी निवड केली आहे. तर राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. भाजपाकडून मह्त्त्वाची पदं शिवसेनेला मिळणार नसल्याचं सांगण्यात आल्याने आता गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड होतेय का? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.