भाजप, शिवसेनेशिवाय 9 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतं! हे आहेत 2 पर्याय
Maharashtra Government Formation (Photo Credits: IANS)

Maharashtra Government Formation: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही राज्यात सत्तेचा तिढा मात्र कायम आहे. मतदारांनी भाजपा- शिवसेनेच्या युतीला कौल दिला असला तरीही सत्ता वाटपावरून सुरू असलेल्या संघर्षामुळे महायुती कितपत टिकणार याबाबत तर्क- वितर्क लावले जात आहेत. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे त्याआधी सत्ता स्थापनेचा दावा करणं गरजेचे आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये भाजपाकडे सर्वाधिक जागा असल्याने ते सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकतात. मात्र बहुमताचा आकडा नसल्याने भाजपाच्या डोक्यावरही टांगती तलवार आहे. मात्र अशा परिस्थितीतही भाजपा समोर 2 अशा सकारात्मक शक्यता आहेत ज्यामुळे ते पुढील आठवड्याभरात सत्ता स्थापनेचा दावा करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतात. Maharashtra Election Winner List 2019: आदित्य ठाकरे, रोहित पवार, देवेंद्र फडणवीस सह हे 288 आमदार करणार विधानसभेत जनतेचं नेतृत्त्व.

1. मायनॉरिटी सरकार

महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष भाजपा असल्याने त्यांना सरकार स्थापनेचा दावा करता येऊ शकतो. मात्र त्यानंतर 15 दिवसांमध्ये भाजपाला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. अशवेळेस राष्ट्रवादीची मदत मागून भाजपा मायनॉरिटी सरकार स्थापन करू शकतं. 145 हा बहुमताचा आकडा कमी करण्यासाठी बहुमत चाचणीच्या वेळेस राष्ट्रवादी खासदार सभागृहात अनुपस्थित राहतील. यामुळे भाजपा सरकारवरील धोका टळेल. दरम्यान भाजपा पुन्हा शिवसेनेची मनधरणी करू शकेल.

2. फोडाफोडीचं राजकारण

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मेगा भरती झाली होती. त्याप्रकारे आता सत्ता स्थापनेसाठी भाजपा 145 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात विजयी आमदारांना आकर्षित करू शकते. भाजपाकडे 105 आमदार आहेत. त्यामुळे अपक्ष आणि इतर असे 40 आमदारांची साथ भाजपाला आवश्यक आहे. त्यासाठी भाजपा मोठी आमिषं दाखवून फोडाफोडीचं राजकारण करू शकते. शिवसेनेचे 45 आमदार खरंच भाजपच्या संपर्कात... की हा आहे शिवसेनेवर दबाव आणण्याचा भाजपचा एक प्रयत्न? वाचा सविस्तर.

दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार 5 नोव्हेंबरला भाजपाने शपथ विधी सोहळ्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम बूक केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुढील 8 दिवस महाराष्ट्रात सत्ता संघर्ष कायम राहणार आहे. परिणामी भाजप पक्षश्रेष्ठी ही राजकीय कोंडी कशी फोंडणार? शिवसेनेसोबत सत्ता समसमान वाटणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या काही दिवसातच महाराष्ट्राला मिळणार आहे.