कोविड सेंटरमधील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून SOP जाहीर
COVID-19 Hospital (Photo Credits: PTI)

कोविड सेंटर्समध्ये (Covid19 Centres) महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळेच आता महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) कोविड सेंटर्स संदर्भात मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या आहेत. या सूचना तात्काळ लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यात 'पॅनिक बटण' (Panic Button), सीसीटीव्ही मॉनेटरिंग (CCTV Monitoring) यांसह एकूण 16 मुद्द्यांचा अंतर्भाव आहे. जाणून घेऊया काय आहेत या SOP... (Corona Center Aurangabad: डॉक्टरची महिलेकडे शरीसुखाची मागणी, औरंगाबाद येथील कोविड सेंटरमधील घटना)

# महिलांच्या कोविड वॉर्डमध्ये पॅनिक बटणाची सोय करण्यात येणार आहे. आपात्कालीन काळात ते बटण दाबून महिला मदत मागू शकतात.

# महिला वॉर्डमध्ये पुरुष कर्मचाऱ्यासोबत महिला नर्स असणे आवश्यक आहे.

# महिला वॉर्डमध्ये एन्ट्री-एक्झिट पॉईंटला सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. तसंच वॉर्डमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद रजिस्ट्ररमध्ये होणे गरजेचे आहे,

# तसंच महिलांच्या वॉर्डमध्ये टॉयलेटची सोय असणे अनिवार्य आहे.

# विशेष म्हणजे महिला वॉर्डमध्ये 24 तास पाणी आणि विजेची सोय असावी.

यासोबतच गर्भवती महिलांसाठी अॅम्बुलन्सची सोय असणे आवश्यक आहे. गर्भवती महिलेसोबत महिला नर्स असणे आवश्यक आहे. तसंच गर्भवती महिलांसाठी कोविड सेंटरमध्ये वॉर्ड राखीव असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे महिलांचा मृतदेह पिशव्यांमध्ये गुंडाळताना पुरुष कर्मचाऱ्यांसोबत महिला नर्स असणे आवश्यक आहे. यांसारख्या महत्त्वाच्या मार्गदर्शन सूचना राज्य सरकारने जारी केल्या असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या अत्यंत आवश्यक आहेत.

दरम्यान, यापूर्वी कोविड सेंटर्समध्ये महिलांवर लैगिंक अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडीकस आल्या होत्या. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न राज्य सरकारसमोर होता.