संपत्तीमध्ये वाढ (Photo Credit : Pixabay)

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांनी (Mumbai Mahayuti Candidates) गेल्या पाच वर्षांत त्यांच्या आर्थिक मालमत्तेत सरासरी 150% वाढ नोंदवली आहे, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी त्यांच्या मालमत्तेत केवळ 20% वाढ नोंदवली आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांनी सरासरी 59% संपत्ती वाढ नोंदवली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सरासरी 18% वाढ नोंदवली. मतदारांना त्यांच्या संभाव्य प्रतिनिधींबद्दल माहिती देण्याचे उद्दिष्ट ठेवणारी एक ना-नफा संस्था इन्फॉर्म्ड व्होटर प्रोजेक्टने, हा आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या आर्थिक मालमत्तेच्या वर्ष-दर-वर्षी वाढीबद्दल त्यांचा विश्लेषण अहवाल प्रसिद्ध केला.

अहवालानुसार, मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची सरासरी आर्थिक मालमत्ता 2019 मधील 62.5 कोटी रुपयांवरून, 2024 मध्ये 156.4 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, त्याच कालावधीत एमव्हीएची उमेदवारांची सरासरी मालमत्ता केवळ 20% म्हणजेच 27.3 कोटी वरून 32.8 कोटी झाली आहे.

त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांच्या आर्थिक मालमत्तेत पाच वर्षांत सरासरी 59% ची वाढ झाली आहे. 2019 मधील सरासरी मालमत्तेच्या 29.6 कोटी रुपयांवरून ती 2024 मध्ये 47.1 कोटी रुपयये झाली. दुसरीकडे, त्याच कालावधीत एमव्हीए उमेदवारांच्या सरासरी मालमत्तेत 18% म्हणजेच 22.5 कोटीवरून 26.5 कोटी अशी वाढ झाली आहे. या अहवालात असे अधोरेखित करण्यात आले आहे की, गेल्या 4 वर्षांत सामान्य भारतीयाच्या संपत्तीचा सरासरी वाढीचा दर दरवर्षी केवळ 0.7% राहिला आहे, तर महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आघाडीच्या उमेदवारांच्या संपत्तीत 17 पटीने वाढ झाली आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, महाविकास आघाडी उमेदवारांची संपत्ती महायुतीच्या उमेदवारांपेक्षा 70% कमी दराने वाढली आहे आणि सामान्य भारतीयांच्या दरापेक्षा 5 पट वाढली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील सर्व डेटाचा स्रोत असलेल्या या अहवालानुसार, भिवंडी ग्रामीणमधील शिवसेनेचे (UBT) महादेव घटक यांनी गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक 1724% ची संपत्ती वाढ नोंदवली आहे. त्यांच्यापाठोपाठ औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट 663 टक्के वाढीसह दुसऱ्या क्रमांकावर, तर हिंगणघाटमधून राष्ट्रवादीचे अतुल वांदिले 649 टक्के वाढीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत, पहिल्या तीन उमेदवारांमध्ये भाजपचे घाटकोपर (पू)चे पराग शाह 3383.07 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह अव्वल, त्यानंतर पनवेलचे प्रशांत ठाकूर 475.86 कोटी आणि मलबार हिलचे मंगल प्रभात लोढा हे आहेत. या यादीत प्रताप सरनाईक, अबू आझमी, मिलिंद देवरा, शायना एनसी, राहुल नार्वेकर, शिवेंद्रराजे भोंसले, दीपक केसरकर आणि अजित पवार यांचाही समावेश आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: आचारसंहितेच्या काळात तब्बल 500 कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त; 6 हजार पथकांमार्फत होत आहे वाहनांची तपासणी)

त्याचप्रमाणे मुंबादेवी येथील शिवसेनेच्या शायना एनसी 424% वाढीसह मुंबईतील उमेदवारांमध्ये सर्वाधिक संपत्ती वाढीच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत, त्यानंतर पराग शाह 390% आणि गोरेगावमधील शिवसेनेचे (UBT) समीर देसाई 374% आहेत. सर्वाधिक संपत्ती मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्लम शेख, झीशान सिद्दिकी, आशिष शेलार, दिलीप लांडे आणि राहुल नार्वेकर यांचा समावेश आहे. सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत पराग शाह 3383.07 कोटी रुपये, लोढा 447.1 कोटी आणि अबू आझमी 309.45 आहेत.